Friday 8 March 2013

८ मार्च २०१३

८ मार्च, जागतिक महिला दिन. हा दिवस दरवर्षी शुभेच्छा घेऊन येतो. कधी न झोपलेला स्त्री असल्याचा अभिमान जागा करण्याची धडपड करत...... खरच हा दिवस  शुभेच्छा देण्याइतका आनंदी असतो? मला अनेक प्रश्न पडले. त्याची उत्तर मिळतील अशी मी अशाच बाळगली नव्हती. अगदी काही दिवसच लोटले असतील त्या घटनेला, दिल्लीतील बलात्कार प्रकरण.... कल्पनेनेच किळसवाणे वाटते आणि क्षणभर मनाला भीती दचकावून जाते. अशा अनेक बातम्या कानावर पडतात आणि अशा अनेक बातम्या वाचनात येत राहतात. अनेक कथाबाह्य कार्यक्रमातून दाखवले जाणारे रुपांतरीत किस्से पाहून मन अस्वस्थ होते. अशा अस्वस्थतेत हा दिवस आनंदी कसा होऊ शकतो.
 
यावर्षीचा हा आतरराष्ट्रीय महिला दिवस मी त्या सर्व महिलांना, मुलींना आणि आईंना अर्पण करते ज्यांनी मला माझ्याच समाजातील एक प्रतिबिंब दाखवले. रात्री अपरात्री एकटी बाहेर फिरण्याची निर्भीडता दिली आणि त्याचबरोबर मी किती असुरक्षित आहे याची जाणीव करून दिली. बलात्कार तर फार दूर राहतो जेव्हा मुलींना आईच्या गर्भातच मारून टाकले जाते. घरगुती हिंसा, बलात्कार, छेडाछेडी, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, अशा अनेक दिव्यातून ती तग धरून उभी राहते. आणि मग अशाच एका 'दामिनी'साठी किंवा दामिनिसारख्यांसाठी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. पुन्हा फिरून येतो हा दिवस पोकळ  शुभेच्छा घेऊन. आणि आतून उचंबळत राहतात या  शुभेच्छांमागील प्रश्नचिन्ह??????

महिला दिनाचे नीमीत्त साधून मी हा माझा ब्लॉग सुरु केला आहे. अनेक दिवस हि मनातील इच्छा मनातच रमलेली होती. आज ती स्वःतःलाच एखादी भेटवस्तू द्यावी तशी भेट म्हणून दिली आणि पूर्ण केली. बस यापुढे यावर नक्की काहीतरी वेगवेगळे लिहित राहेन. माझ्या ब्लोगला जरूर भेट द्या व लेखनाबद्दल प्रतिक्रिया जरूर कळवा. शेवटी एक महिला म्हणून प्रत्येक महिलेसाठी समाजातल्या प्रत्येकाला मी सांगते,

'हो, महिलादिन आनंदीच असावा हि माझी मागणी आहे'

- काजल नाईक