Monday 28 October 2013

राजसाहेब ठाकरे यांचे प्रत्यक्ष ऐकलेले भाषण

रविवारी (२७/१०/२०१३) संध्याकाळी आमंत्रणावरून एका काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व एका अल्बमचे विमोचन सोहळ्यास गेले होते. प्रकाशन म.न.से.चे पक्षप्रमुख माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. त्याठिकाणी त्यांनी २ मिनिटे भाषण केले. ते असे होते.
साहेबांना २ शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. ते उठले तशा प्रेक्षकांनी एकच गलका केला. माईकजवळ पोहोचताच शिस्तबद्ध श्रोत्यांप्रमाणे सर्वत्र शांतता झाली.
एका तान्हीने निरागसतेने आवाज केला: येऽऽऽऽ
साहेब: हां, काय आहे.
एकच हशा पिकला गेला. हशा शांत झाला तसा दुसरी एक चिमुरडी मोठ्या माणसांचे अनुकरण करत मोठ्याने हसत राहिली. तिचे हास्य सगळ्यात शेवटी शांत झाले.
साहेब: हा काय उशिरा लाफ्टर आला वाटतं. आजकाल सगळीकडे एक फॅशन झाली आहे की मी जिकडे जातो तिकडे माझ्या नावापुढे ‘वक्तृत्त्व-कर्तृत्त्व’ असे काही बाही बोलले जाते. (निवेदिका समीरा गुर्जर हिने तिच्या प्रस्तावनेत साहेबांच्या नावापुढे हिच शब्द वापरली होती. तो तिचा प्रयत्न साहेबांना वायफळ वाटला असावा म्हणून कदाचित हा टोला असावा) माझे वडील संगीतकार होते म्हणून मला संगीताचा कान आहे. पण माझ्या हातून अल्बमचे प्रकाशन व्हावे म्हणजे...... (हशा) त्यादिवशी मला बाळा नांदगावकर यांनी सांगितले की तुम्हाला ध्वनिफितीचे प्रकाशन करायला जायचे आहे. तर मला वाटले की काय काय आपल्या वाट्याला येणार आहे कोणास ठाऊक.(हशा). आपल्याला काय सांगितले करायला तर करायचे. (हशा). (ध्वनिफितीचे नावाचा; ‘हृदयातील एक हळुवार कोपरा’ संदर्भ घेत) हे काय हळुवार कोपरा वगैरे....... आपल्याला हळुवार काही जमतच नाही. आपण जे करतो ते जोरदार करतो. (हशा) मला आत्ताच कळले की ते (कवी) व्यायाम वगैरे करतात. (कवीचा मुख्य व्यवसाय व्यायामक्षेत्र आहे) म्हणजे पुढल्या वर्षी ‘मांडीवर एक हळुवार मसल्स’ वगैरे नका करू..... (हशा) वजन उचलणारा माणूस शब्दात वजन कसा आणतो मला कळले नाही. (हशा) त्याबद्दल त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. आपल्या गाणे ऐकण्याच्या कार्यक्रमात मी व्यत्यय आणल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज तुम्ही अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकायला इथे आला आहात. तर येणा-या दिवाळीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हि दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, समृद्धीची व आरोग्यदायी जावो. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!!!