Saturday 8 March 2014

गंध माझा विसरू नकोस.....!

प्रिय....?
माझ्यासाठी तू सदैव प्रियच होतास.
कसा आहेस तू...? माझे हे पत्र पाहून अतिशय अवाक् झाला असशील ना...?
अचानक, अनपेक्षितपणे इतक्या वर्षाने माझे असे पत्र आलेले पाहून तुला फारच आश्चर्य वाटले असेल ना....? की तू माझ्या पत्राची वाटच पाहत होतास?
किती वर्षे झाली रे....? १६...? नाही रे तब्बल १८ वर्षे...?

१८ वर्षांनी तुला पत्र लिहिताना माझे हात थरथरताहेत, मनात चलबिचल होतेय आणि खूप खूप रडू येतेय. काय काय आणि किती किती गोष्टी तुला सांगायच्या राहिल्यात. पण एकदा ठरवलं की आता गप्प नाही बसायचे.... मी नाहीच सांगितले तर तुला कळणारच नाही, म्हणून हा खटाटोप.

आपल्या कॉलेजचे दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात सोनेरी दिवस होते. नंतर काही त्या सुवर्णफुलांचा सडा माझ्या अंतरात पडलाच नाही. हो, कधीच नाही... कारण तो सडा मीच माझ्या अंगणात पडू देणार नव्हती. मीच मुद्दामहून तो पारिजात माझ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय माझा स्वतःचा नव्हता. मी माझ्या लग्नाच्या दिवशीच स्वतःला मनापासून अग्नी दिला व आयुष्याची राख करून घेण्यास तयार झाली. अंतरपाटा पलीकडे कुठून तरी तू येशील असं वाटत होतं....

भटजीच्या कर्कश्श्य आवाजाबरोबर मी होरपळले जात होते, पडणा-या अक्षता अंग अंगाला बोचत होत्या, मी सुन्न उभी होती, हातातून हार गळून पडेल असं वाटत होते आणि नेमकं तेव्हाच आंतरपाट दूर झाला.

समोर तू नव्हतास,
समोर तू नव्हतास...?
हा कोण आहे..? माझ्या हाताला आईच्या हाताचा स्पर्श झाला आणि मी हार त्या अनोळखी व्यक्तीच्या गळ्यात घातला. मग त्याने हार गळ्यात घातला. आणि मी लग्नमंडपातच कोसळले. मग मात्र कळलेच नाही काय होतेय ते..... सगळे जण येत गेले आणि शुभेच्छा देत गेले.

माझ्या डोळ्यांसमोर तर तुझे नी माझे दिवस तरळत होते. कॉलेजच्या अन्युअल फंक्शनला आपण दोघांनी केलेला तो कपल डान्स मला आठवू लागला. आणि मग स्टेजच्या मागे एकत्र बसून चांदणं बघत घालवलेला तो वेळ.... तेथेच तू मला प्रपोज केलं होतंस.....

मध्येच कोणाच्या तरी पाया पडायला वाकावे लागायचे, डान्समध्ये घेतलेल्या गीराकीप्रमाणे क्षणभर वाटायचे मग पुन्हा तुझा चेहरा समोर यायचा.
चांदण्यातून फिरताना मग तू हळुवार माझा हात हातात घेतला होतास आणि स्टेजवर ‘पहिला पहिला प्यार है’ चे सूर ऐकू येऊ लागले. तुझ्यासाठी अनुभवलेलं ते पहिलं वहिलं प्रेम....? आणि मग दोन क्षण तुझ्या डोळ्यांत पाहून वाटलेला विश्वास....

नंतर प्रक्टिकलच्या वेळेस ते चंबूतून एकमेकांकडे पाहणं. त्या चंबूतून तुझं वाकडं नाक सरळ दिसायचं... आणि मग मला गालातल्या गालात हसू यायचं. रात्र रात्रभर बसून तुझ्या जर्नल पुर्ण करता करता नाकी नऊ आले होते माझ्या. आणि तू फक्त समोर बसून बघत रहायचास मला. तेवढा वेळ मिळायचा तुला पण जर्नल मात्र मीच पूर्ण करायच्या तुझ्या, दुष्टा,

हा प्रवास डोळ्यांसमोरून सरकत असताना हळूच दादाने जवळ घेतलं आणि हमशाहमशी रडत कानात कुजबुजला, आता शांत हो, मी आहे तुझ्यासोबत, आईने माहेर तोडलं असंलं तरी हक्काने ये मी समाजावेन आईला

मग भानावर आले आणि इथे तिथे पाहिलं तर मागे मावशीच्या कुशीत रडणारी ही माझी आई आहे.... जी काही दिवसांपूर्वी माझा जीव घ्यायला निघालेली आणि आज मी दूर जातेय म्हणून रडतेय....
खरं सांगते तुला, त्या क्षणीही तू कुठूनतरी यावंस आणि त्या अनोळखी माणसाच्या जागी येऊन बसावसं असंच मला वाटत होते. मग दादाने गाडीत बसवलं. मी आता वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःला सावरले. नुकत्याच  झालेल्या माझ्या घरी आले तेव्हा तिथली माणसं फारच छान वाटली. फार प्रेमाने वागवत होती. नवलाईचे माझे दिवस... मी त्या प्रेमाने हुरळून गेले. माझ्या सासूबाई खूपच प्रेमळ होत्या. त्यांनी मला फार प्रेमाने वागवलं. तुला विसरता येत नव्हतं आणि सासूबाई खूप प्रेम करू लागल्या होत्या. पाच पर्तावनाचा कार्यक्रम दादाने फारच जल्लोषात पार पाडला. त्यादिवशी मी आईला भेटायला गेले तर तिने मला जवळही घेतले नाही. डोळे वटारून मला म्हणाली, तू माहेरी कधीही ये पण तुझी आई तुझ्यापासून तुटली आहे हे लक्षात घे. काळजात काहीतरी रुतल्यासारखे झाले. लहानपणी हातून काही चूक घडली की आई अशीच डोळे वटारायची आणि तिच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची. मग मी रात्रभर माझ्या खोलीच्या खिडकीतून तो पिंपळ बघत रहायची. आणि तू आयुष्यात आल्यानंतर तर तुझ्याशी भांडल्यावरही मी तो पिंपळ बघण्यात गुंग व्हायचे.

तुला आठवतात का रे आपली भांडणे? फार क्वचित पण फार मोठी झालेली. आणि ते भांडण तर फारच मोठे झाले होते. मला पावसात वाट पाहायला लावून तू चक्क एकटा भिजत भिजत गेलेलास. आणि तब्बल ४ तासाने परत आलास. हातात फुलं घेऊन. मला नकोच होती तुझी ती फुलं. मी न घेताच तशीच घरी आले होते. आणि मग रात्री पिंपळ पाहताना त्या पिंपळाखाली मी तुला पाहिले. कुडकुडत, तीच फुलं हातात घेऊन, माझी खिडकीत येण्याची वाट पाहत उभा होतास. मला पहिल्यांदा तो भास वाटला. पण मग तुला पाहून मला जो धक्का बसला होता तो माझा मलाच माहित. आता तुला घरात तरी कशी घेऊ? आई, दादा सगळेच घरात होते. तू कान पकडून सॉरी म्हणू लागलास, मला ती फुलं देण्यासाठी तू असा चिंब भिजत उभा होतास. पण आता त्याचा काय उपयोग होता. मग मी माझ्या खिडकीतून टॉवेल आणि दादाच्या कपाटातले एक टी -शर्ट तुझ्याकडे भिरकावले. वेऽऽऽडा कुठला.

तो पिंपळ आजही मला तितकाच हवाहवासा वाटतो रे. पण काय करू गेली १८ वर्षे मी तो पाहिलेलाच नाही. जसे आईला पाहिलेले नाही. दादाने मला वारंवार त्या घरात बोलावूनही मी माझ्या माहेरी गेलीच नाही. आईने माहेर तुटले असे सांगितले आणि मी ते मुद्दामहून तोडून घेतले.

काय झालं असतं जर आईने आपल्या दोघांच्या लग्नाला होकार दिला असता. काय फरक पडला असता जर आपले लग्न तू डॉक्टर झाल्यावर ५ वर्षांनी झाले असते. जितकी श्रीमंत सोयरिक आईला हवी होती तितका श्रीमंत तू झाला असतास. तू ही तितकंच कमावलं असतंस रे... माझा फार विश्वास होता तुझ्यावर, तुझी दूरदृष्टी, तुझी ध्येय, तुझी हुशारी याची चर्चा आपल्या कॉलेजमध्ये होतीच. केवळ मलाच नाही तर आपल्या प्राचार्यांनाही तुझ्या कर्तबगारीवर फार विश्वास होता. डॉक्टर बनण्याचे तुझे ध्येय मला फार अचंबित करायचे. पण आईला आपल्या प्रेमाविषयी कळले आणि सगळंच विस्कटून गेलं.

मला तुझी व्हायचं होतं. मला आयुष्यात फक्त तूच हवा होतास. माझं सर्वस्व केवळ तुलाच द्यायचं होतं. पण आईपुढे काहीच चालले नाही  माझे, नाही तुझे, ना तुझ्या आई वडिलांचे, ना माझ्या दादाचे. कारण मीच मुळात कमकुवत बनले, तिने लहानपणापासून केलेल्या कष्टांची ढाल बनवली व मी हताश झाले. तिचे ते वटारलेले डोळे आठवले की आजही अंगावर काटा येतो. कारण त्या डोळ्यांची मला लहान असल्यापासून भीती होती. एका रात्री दादा घरात नव्हता. आईने मला सांगितले की तिने माझे लग्न ठरवले आहे. टेबलावर फोटो आहे तो पाहून घे मी सर्वस्व एकवटून आईला म्हणाले आई मला फक्त त्याच्याशीच लग्न करायचे आहे. मी नाही पाहणार तो फोटो मी नाही लग्न करणार त्या मुलाशी, माझं शिक्षणही तू पूर्ण होऊ देणार नाहीस का? आई निवांतपणे उठली आणि जाऊन अंगावर रॉकेल ओतू लागली. मी धावत गेले.

आईऽऽऽ, अग नको करूस असं. मला समजून घे. प्लीज एक खाडकन चपराक बसली कानशिलात. आईचे तेच डोळे, रक्त साकळलेले आणि मी शांत झाले. तोंडातून यंत्रवत शब्द बाहेर फेकले गेले आई, तू सांगशील तेच आणि तसेच होईल पण नको, तू जीव नको देऊस.

त्याच रात्री मी तुला फोन लावला. मी आता तुझ्याशी लग्न करणार नाही, माझ्या आईने माझ्यासाठी खूप चांगला मुलगा शोधला आहे. मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. मला फोन नको करूस आणि काहीच संबंध ठेवू नकोस माझ्या बोलण्यामागचा तो अस्पष्ट हुंदका तू ओळखलास आणि म्हणालास मला माहित आहे की तू हा निर्णय का घेतला आहेस ते. तुझ्यावर मी काहीच जबरदस्ती करणार नाही. पण तुझ्या सप्तपदी होईपर्यंत मला कधीही बोलव मी धावतच तुझ्याकडे येईन तुला तिथून घेऊन जाईन. सुखी राहा. तेच शब्द आजही आठवून मी जगते आहे. हेच शब्द माझ्या जगण्याचा आधार आहेत.
आणि मग सुरु झाले माझ्या आयुष्याचे एक अनाकलनीय पर्व, काळोख्या रात्री एखाद्या ओसाड वाटेचा शेवट मिळू नये तसे.

पाचपर्तावनानंतर मी कधीच माहेरी गेली नाही. त्या रात्री माझ्या आयुष्यात पूर्ण बदल होणार होता. ज्या रात्रीची मी केवळ आणि केवळ तुझ्याच बरोबर कल्पना करू शकत होते. ती रात्र मला त्या अनोळखी ब्याक्तीबरोबर घालवावी लागणार होती. सासूबाईंनी अगदी आईसारखे समजावून सांगितले. हि रात्र मुलीच्या आयुष्यातली किती मोलाची रात्र असते. त्यांच्या त्या आपुलकीने वाटले की खरंच इतकी का प्रेमळ आहे हि बाई. का हि मला इतका जीव लागते. मग मनातल्या मनात त्या माणसाला ओळखीचे करायचे ठरवले. केवळ त्या बाईसाठी..... खूप उशिरा रात्री तो आला.... मनात खूप भीती वाटली. पण मान वर करून बघितलं नाही त्याला. तो बाजूला येऊन बसला म्हणाला मी उद्या परत अमेरिकेला जाणार आहे. मला माफ कर पण मी यापुढे कधीच तुझा होणार नाही. मला माझ्या आईने सक्ती केली होती आणि तुझ्या आईनेही लग्नाची घाई केली म्हणून मी लग्न केले. पण खरंतर माझ्या आईला हे माहित नाही की माझे अमेरिकेत आधीच लग्न झालेले आहे. तिच्या आजारपणामुळे मी तिला दुखवू शकलो नाही. मी तुझी आणि आईची सर्व जबाबदारी पेलीन आणि जर तुला हवं असेल तर आपलं मुलही होईल. पण माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नकोस. निर्णय तुझा आहे. तुला डिवोर्स हवा असेल तर तसं नाहीतर तू इथे राहू शकतेस. माझं काहीच म्हणणं नाही.

खरं सांगते तुला, तेव्हा मला फार आनंद झाला होता की आज रात्रीनंतर हा मुलगा मला भेटणार नाही. मग जाणीव झाली की हे वादळ किती मोठं आहे. एकदम हताश झाल्यासारखं वाटलं. मी त्याला म्हणाले, तू  निश्चिंत होऊन अमेरिकेला जा. माझी काहीच तक्रार नाही. तो पाठ फिरवून झोपून गेला. मी त्या आलिशान बंगल्याच्या खिडकीत उभी राहिले. इथे कोणताही पिंपळ नव्हता मग तू कसा असशील. पण
व-याची झुळूक इथे येते-जाते. बस्स! पिंपळाला जसे डोळ्यांत भरून घेतले होते त्याचप्रमाणे ती झुळूक मी ऊरात भरून घेते. हिच्यासारखे आपल्यालाही वाहता यावं असं वाटते मला.

त्याच माझ्या वेड्या कल्पना आजही मी करते. तुझ्याकडे करायची तशीच..... पावसाच्या सरीवर लटकणे, ढगात आंबा शोधणे, पाटीवरची पेन्सिल चावणे, नवीन पुस्तकाचा वास घेणे, पायाच्या अंगठ्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करणे, तापलेल्या तव्यावर मुद्दामहून पाणी शिंपडणे आणि....? आणि बरेच काहीतरी होते ना रे? मला तर इतकेच आठवते आहे.

माझा नवरा जसा बोलला अगदी तसाच तो निघूनही गेला. सहज. मग उरलो फक्त सासूबाई आणि मी. खरंतर मी आणि तू. सासुबाईंनी खूप जीव लावला. खूप प्रेम दिलं. तुला मी तोडलं, आईने मला तोडलं, मी माहेर तोडलं, नव-याने मला तोडलं पण मला सासूबाईंनी जवळ केले. अगदी त्यांच्या मुलासारखे. तो दर महिन्याला पैसे पाठवत गेला आणि दर वर्षाला एकदा येत गेला. त्याने फक्त एकदाच विचारले. आपलं मुल तुला हवं आहे का? मी म्हणाले, नकोच जसं चाललंय तसंच चालू दे.
अगं, पण आई फार मागे लागली आहे. त्याने सांगितले.
मी माझ्यात काहीतरी कमी आहे असं सांगेन त्यांना. मी घेईन सांभाळून त्यांना. तू मात्र त्यांच्यासाठी एकदा तरी येत जा. मी सांगितले.

मी सांगितले कारण मला तुझे उष्ण श्वास विसरायचे नव्हते. आपण एकत्र घालवलेले ते अविस्मरणीय क्षण, तना-मनावर कोरले गेलेले, सीमोल्लंघन होण्याआधी सावरलेले. ती गुंफण, ती शृंखला मला विस्कटायची नव्हती. तुझे बाहु भरून मला सावरणे आणि त्यात माझे विरघळणे आठवते का रे तुला आजही. मला आठवते.... प्रत्येक क्षणी आठवते. आज अठरा वर्षांनतरही त्या खुणा कणभरही धूसर झालेल्या नाहीत. त्या वर्षीचा माझा वाढदिवस एकमेकांसोबत साजरा करताना एकमेकांना अनुभवले होते. आणि माझा वाढदिवस सासूबाई दरवर्षी न विसरता साजरा करतात.

त्या कधीच विसरल्या नाहीत माझा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, माझा आवडता रंग, माझे आवडते खाणे, मला आवडणारे ठिकाण, माझे आवडते पुस्तक, माझं आवडत गाणं, आणि बाकी सर्व आवडणारं. जे जे काही त्या मला देऊ शकल्या ते ते त्यांनी मला दिलं. अगदी न मागता. त्यांना जर तुझ्याविषयी माहित असते तर त्यांनी तुलाही माझ्या पुढ्यात आणून उभं केलं असतं.

असं म्हणतात की, सगळे दरवाजे बंद झाल्यावर नियतीचा दरवाजा उघडतो. तुझ्यानंतर माझ्या सासूबाई नियती बनून माझ्या आयुष्यात आल्या आणि माझे आयुष्य त्यांनी स्वतःच्या सुगंधाने दरवळून टाकले. माल आधार दिला, प्रेम दिलं, कधी माहेरी जावं असं वाटलंही नाही मला. दादा मात्र न चुकता येत गेला. आईने घरी बोलावलं आहे असं नेहमी सांगत होता. पण मी गेले नाही. मी सासूबाईंनाच आई म्हणू लागले.
गेली अठरा वर्षे मी तुझ्या आठवणींसोबत व त्यांच्यासोबत जगात होती. पण आता केवळ आणि केवळ तुझ्या आठवणी उरल्या आहेत. कारण माझ्या सासूबाई बारा दिवसांपूर्वी वरल्या. मला सोडून गेल्या. माझे आयुष्य पुन्हा एकदा भयाण करून गेल्या. त्या गेल्या तेव्हा आतून काहीतरी उचकटल्यासारखे वाटले. आईने माहेर तोडल्यावरही वाटलं नव्हतं तितकं पोरकं वाटलं. एका वाळवंटात एकट पडल्यासारखं.....
जेमतेम आठवडाभर त्या आजारी होत्या. शेवटच्या क्षणी मला म्हणाल्या की आयुष्यभर तू माझ्या मुलाकडून मिळालेली जी सल भोगते आहेस ती मला माहीत आहे. पण तुझी क्षमा मागण्याची हिम्मत नव्हती माझ्यात. भीती वाटत होती की तू मला सोडून जाशील. यासाठीच कधीच तुला हे सांगितले नाही की मला सर्व माहित आहे. माझ्या मुलाला माफ केलेस तसेच मलाही माफ कर आणि मुक्त कर माझा हात हातात घट्ट पकडून त्यांनी प्राण सोडले. म्हटलं हे कसलं ओझं त्यांनी इतकी वर्ष बाळगले? आणि का? मी तर स्वतःच पोरकी होते. मी ह्यांना सोडून कुठे जाणार होते.

नवरा म्हणाला की थोडे दिवस माझ्याकडे चल, आई आणि दादाही म्हणाले की आमच्याकडे चल. पण मी नाही गेले. कारण मला आता कुठेच जायचे नाही. तू नेहमी म्हणायचास वादळ आलं तर ताट उभं राहू नये. आपण लवचिक रहावे. तर फक्त हेलपाटू पण ताट राहिलो तर कालांतराने तुटून जाऊ मी अगदी तसेच केले. अगदी तसेच. मी प्रत्येक वादळासमोर लवचिकपणे हेलापाटले. पण आता नाही रे आता मी नाही अजून या वादळात तग धरू शकत. माझा सायलीचा वेल, माझा आधार; माझ्या सासूबाईच आता राहिल्या नाहीत. मी काय करू.

त्यादिवशी टी.व्ही. चॅनेलवर तुझी मुलाखत पहिली होती. खूप वेळ अगदी टी.व्ही. जवळ बसलेले. तुला निरखत, तुझ्या जवळ.... आणि मग तिथूनच तुझ्या िक्लनिकचा पत्ता घेतला. बरेच दिवस होता माझ्याकडे पण अशा कारणासाठी तुला पत्र लिहावे लागेल असं वाटले नव्हतं. तू मोठा डॉक्टर झालं आहेस. यात काही वादच नव्हता. तो तर तू होणारच होतास. तुझे यश पाहून वाटले अजून काय हवंय आयुष्यात.

पण पुरे आता! खूप झालं जगणं, श्वास घेणं, दिवस ढकलणं. सासूबाईंनंतर आता फारच कठीण होईल. त्यातही तुझ्या आठवणी का कमी होत्या जगण्यासाठी. हे पत्र तुला मिळेपर्यंत मी स्वतःला संपवलेलं असेन. मला फार वाटायचे की आपले लग्न झाले असते तर तुझ्याआधी मी जावे. लग्न नाही झालं म्हणून काय हरकत आहे पण मी तुझ्या आधी जाते आहे. तुझ्या अधिक जवळ येण्यासाठीच.

जेव्हा कधी वा-याची झुळूक तुझ्यावरून जाईल तेव्हा तेव्हा माझा गंध ओळखण्याचा प्रयत्न कर. मी तिथेच असेन तुझ्यासोबत.

जी सदैव तुझ्यासाठी झुरली
--------