Friday 16 August 2013

पाणी पाणी रे.....

एकदा मुंबईतल्या ताडदेव येथे मिळणाऱ्या प्रसिद्ध हॉटेल सरदारची पावभाजी खायला गेलो. पावभाजी तर चविष्ठ होतीच पण ती खाऊन आम्ही बाहेर पडलो आणि बस स्टॉपवर येऊन उभे राहिलो. बराच वेळ बसची वाट बघितली. तहान लागली म्हणून मी त्याच सरदार पाभाजीकडे गेली व पाणी मागितले; त्यावर त्या वेटरने मला ‘मॅडम मिनरल वॉटर नाही चलेगा’ असं विचारलं. मी त्याच्या प्रश्नाने आव्वाक झाले. कारण मी त्याच पावभाजी सेंटर मधून पावभाजी खाऊन बाहेर पडले होते तरीही त्याने मला एक ग्लास पाणी मागितले तर चक्क ‘पाणी विकत घेणार का?’ या अर्थाचा प्रश्न विचारला होता. ‘का रे बाबा एक ग्लास पाणीही तुला महाग झाले का?’ असा प्रश्न मी त्याला विचारल्यावर मग त्याने मला पाणी आणून दिले.
आजकाल प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या स्टॉलवर मिनरल वॉटरच्या पाण्याच्या बाटल्या अतिशय आकर्षक पद्धतीने लावलेल्या असतात. प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वेटर येऊन विचारतो, “मिनरल वॉटर की नॉर्मल वॉटर’, प्रत्येक सिनेमागृहात स्वतःच्या बॅगेतून पाण्याची बाटली नेण्यास परवानगी नसते. मुख्यतः पाणी पिण्यासाठीही जर का नागरिकांना पैसे द्यावे लागत असतील तर त्याहून दुसरी खेदाची बाब नाही. आणि या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही ही तर पहिली खेदाची बाब आहे. कारण आता पाणी सहज उपलब्ध असते या कारणाने आपण खुश होत राहतो पण ते पाणी पैसे देऊन मिळणार असते म्हणजे ते काही सहज मिळणार नसते हे तरी समजून घ्यायला पाहिजे. पण आपल्याकडे या गोष्टी लक्षात कोण घेतो या कप्प्यात टाकल्या जातात.
माझ्या लहानपणी मला आठवते तोपर्यंत तर अनेक ठिकाणी काही धार्मिक संस्थांच्या किंवा काही समाजाच्या नावाने पाणपोई चालवल्या जात असत. तिकडे थंड पाण्याला १ रुपया किंवा ५० पैसे लागत व साधे पाणी फुकट मिळत असे. आता अशा पाणपोई दिसणे अशक्यच आहे. तेथील पाणी अतिशय स्वच्छ व पेलेही व्यवस्थित धुतलेले असत. त्या पाणपोई कोणी बंद पाडल्या....? अनेकदा रस्त्यावरून चालता चालता तहान लागली तर आजूबाजूच्या घरांतून, दुकानातून किंवा अगदीच नाही तर हॉटेलमधून पाणी मागून पिण्याची सोय होती. आज कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यास स्वतः तहान लागलेला व्यक्तीही पाणी मागत नाही तर तो मिनरल वॉटरची बाटली खरेदी करतो. गोरेगाव येथील रत्ना हे हॉटेल काही वर्षांपूर्वी शाळेतून दुपारच्या वेळेस परत जाणाऱ्या मुलांना प्यायला पाणी देत असे. अर्थात, शाळेतून परत जाणारी मुलं म्हणजे घोळकाच असे तो. त्यांना पाणी देताना अनेक ग्लास वारंवार मुलांना द्यावे लागत. त्या हॉटेलमधूनही हा रतीब नियमित पाळला जात होता. आता प्रत्येक दुकानातही पाण्याची बाटली विकत मिळू लागली आहे मग कोणीही उगाच पाणी फुकट देण्याचे उदारभाव का दाखवेल. मला माझ्या गावाच्या एका भावाने सांगितलेलं की परीक्षेला किंवा कोणत्याही कामाला जाताना जर रस्त्यावरून पाणी घेऊन जाणारी बाई दिसली तर तिच्याकडून पाणी मागावे. तुम्ही ज्या कामाला जाता आहात ते काम व्यवस्थित पार पडते. हि गोष्ट कोणी मानावी किंवा न मानवी त्याबद्दल वाद नाही पण मुळात पाणी घेऊन जाणाऱ्या बाईकडून पाणी मागण्याची सोय होती तर.....
मुंबईतील रेल्वे स्थानक आठवून पहावीत.... तिकडे पिण्याच्या पाण्याच्या ज्या टाक्या असतात त्याची अवस्था तर अवर्णनियच म्हणावी लागेल. त्यांची कित्येक वर्षात स्वच्छता झालेली नसते. त्यात पाणी असते की नाही इथपासून शंकेसाठी जागा आहे. शिवाय नळ कधी गळकेच असतात तर कधी अजिबात चालत नसतात.  मग त्या टाक्या तिथे असण्याचे कारण काय...? तिथला खाण्याच्या स्टॉलवर मात्रा मिनरल वॉटरच्या बाटल्या अगदी रुबाबात लटकत असतात. रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रसाधनगृहांची तर चर्चाच करता येणार नाही. त्याबद्दल मी पुन्हा कधीतरी लिहेन. असेच काहीसे चित्र असते ते बहुतेक सिनेमागृहांत.... तेकडेही एकतर खाण्याच्या पदार्थांच्या किमती या बाहेर मिळणाऱ्या किमतींच्या तुलनेत दुप्पट असतात. आता त्या दुप्पट का असतात यामागे काही ठोस कारण असेल असे मला वाटत नाही. तरीही आपण मुद्द्यावर येऊया ते म्हणजे तिकडे मिळणाऱ्या पाणी संस्कृतीवर. सिनेमागृहांत पाणी नेऊ देत नाहीत. मग मध्यातरानंतर आत तिकडेच मिळणारा खाऊ व कोल्ड्रिंक कसे आत नेणे शक्य असते. त्या सिनेमागृहांत पिण्याच्या पाण्याची लहान बाटलीही मिळत नाही घ्यायची असल्यास मोठी बाटलीच घ्यावी लागते. पण तिथली प्रसाधनगृह मात्र अतिशय स्वच्छ, अद्ययावत व भरपूर पाणी पुरवठा करणारी असतात. तिथे प्रशस्त जागा असते. पण पाण्यासाठी तिथला पाणी पुरवठा तोकडा होतो. याची कारणं ०९८पो; कोण विचारणार...? या सर्वांचा जाब कोण विचारणार...?
नाशिक किंवा नागपूर या शहरांत एक टेम्पो चालक आहेत. ते भर उन्हाळ्यात आपल्या टेम्पोमध्ये पिण्याच्या पाण्याची एक टाकी घेऊन मैलोन्मैल प्रवास करतात. उन्हाळ्यात पाण्याची तहान भागवता यावी व पाण्याविना कोणालाही त्रास होऊ नये हाच त्यांचा उद्देश असतो. मग असे काही प्रयोग मुंबई-पणे सारख्या शाहारांत का होत नाहीत. इथेही पाण्याची तितकीच गरज असते. पण इथला समाज हा अधिकाधिक चैनीच्या मागे धावणारा आहे. त्याला मिनरल वॉटर हे एक उच्च वर्गाचे प्रतिक वाटते. म्हणजे ज्याच्या हातात मिनरल वॉटरची बाटली तो अधिक समाजभान असालेला असं गैरसमज समाजात भिनलेला आहे. पण घरातून आणलेली पाण्याची बाटली बाहेर काढून ते पाणी पिणे हे कमीपणाचे वाटते. घराघरांतून पाणी मागणे, दुकानांत किंवा हॉटेलमधून पाणी मागणे हेदेखील कमीपणाचे वाटते.
पाण्याच्या बाबतीत आताशा अनेक जाहिरातींमधून पाणी स्वच्छ नाही. आजारपण किंवा संसर्ग होण्याच्या शक्यता सामान्य माणसाच्या मनावर ठळकपणे बिंबवल्या जातात. जर पाणी स्वच्छ नसणे आणि त्यामुळे मिनरल वॉटर पिण्याचा ट्रेंड वाढत आहे तर मुळात ते मिनरल वॉटरध्ये किती मिनरल असतात याचाही विचार करावा. ते किती शुद्ध असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्यापैकी किती जण करतात. म्हणजे जर ते पाणी निर्जंतुक आहे की नाही याची खात्रीच नसेल तर त्यासाठी पैसे का मोजावेत.
नाक्यानाक्यावर बंद पडलेल्या पाणपोई पुन्हा सुरु झाल्या तर त्या किती चालतील? किती जण त्या ठिकाणी येऊन पाणी पितील? किती जणांना त्यावर विश्वास असेल की तिथले पाणी हे स्वच्छ आणि पिण्यास योग्य आहे. मग अशा ठिकाणी ज्या पाणी निर्जंतुक करण्याचे यंत्र विकणाऱ्या कंपनींनी त्या पाणपोईवर आपल्या मशीन का नाही लावत किंवा तशा पाणपोई स्वतः सुरु का नाही करत? प्रत्येक सिनेमागृहात जर प्रसाधनगृह स्वच्छ ठेवण्यात लाखो लिटर पाणी व तसेच पाण्यासारखे रुपये खर्च केले जात असतील तर एखादे पाणी निर्जंतुकीकरण करणारे यंत्र लावून तेथे मोफत पाणी पिण्याची सोय का नाही ठेवता येत? रेल्वेच्या टिकतात पिण्यासाठी पाणी व स्वच्छ प्रसाधनगृह मिळाले पाहिजेत हा नागरिकांचा हक्क आहे हे नागरीकांना कधी कळणार? पिण्याचे पाणी जर इतकेच जीवावर बेतणारे असेल तर पाणी हे जीवन आहे किंवा पाणी देण्यासारखे पुण्य नाही असे का म्हटले जाते.......?
प्रश्नांची सरबत्ती तर कधी सुटणार नाही पण जिथे प्रश्न तिथे उत्तरं मिळवण्याचा ध्यास हवा.या सगळ्याला आळा घालण्याचे प्रशासनाच्या माथी मारण्याआधी ते काम नागरिकांनी स्वतः करायाला हवे. म्हणजे काय की आपल्या घरात आपण जे पाणी पितो तेच पाणी सोबत घेऊन घराबाहेर निघावे. जिथे जाल तिकडे जर पिण्याचे पाणी उपलब्ध असेल तर तिथून पाण्याची बाटली री-फिल अर्थात भरून निघावे. रेल्वे स्थानकावर जो अधिकारी असतो त्याला जाऊन पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ झालेली नाहीये किंवा प्रसाधागृह स्वच्छ झालेले नाहीये अशी तक्रार करावी. त्यावर लगेच कृती केली जावी अशी अपेक्षा ठेऊ नये. पण अशी तक्रार अनेकवेळा अनेकजणांकडून गेली तर त्यावर नक्की कृती होईल हा विश्वास ठेवावा. पाणी काय जसे वळवाल तसे वळते पण या पाण्याने आपल्याला वळवावे असे होऊ देऊ नये.